माझी कर्जमाफी झालीच नाही, सोशल मीडियावर व्यथा मांडत शेतकर्‍याने संपवलं जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना शासनाच्या योजनांची कुठलीही अंमलबजावणी न झाल्याने, कर्जमाफी न मिळाल्याने तसेच विद्यार्थ्यांची फी माफ न झाल्याने अस्वस्थ झालेल्या एका शेतकऱ्याने आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपले जीवन संपवले.

नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. गेल्या ७० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने आहे त्या सोयाबीनचे देखील वाटोळे झाले आहे. शासनाने विविध योजना, कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांची फी माफी जाहीर केली; मात्र त्याचा फायदा होत नसल्याचे दिसून आले. नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपली व्यथा मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी आहेत. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या शंकर क्षीरसागर यांच्याकडे अत्यंत कमी शेती होती आणि उदरनिर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन त्यांच्याकडे नव्हते. यावर्षी त्यांनी मोठ्या उत्साहाने सोयाबीनची लागवड केली होती, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक हातातून गेले. शेतीतून उत्पन्न मिळण्याच्या आशा मावळल्या होत्या. एकीकडे शेतीतील नुकसान व दुसरीकडे कर्जाची परतफेड यामुळे ते विवंचनेत होते. क्षीरसागर यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

व्हिडीओमध्ये आपली व्यथा मांडताना त्यांनी म्हटले आहे की, “मला एकाही कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही. माझी कर्जमाफी झालीच नाही, शिवाय शासनाने मुलीची फी माफ करण्याची घोषणा करूनसुद्धा तिला न्याय मिळाला नाही. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चामुळे मी काही दिवसांपासून चिंतेत होतो. शासनाने मला कुठलीही मदत दिली नाही. जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही तरी आमच्या कुटुंबाला न्याय द्याल अशी अपेक्षा होती. मात्र मी निराश झालो. आता मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे.” असे म्हणत त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. महसूल प्रशासनही त्यांचा शोध घेऊ लागले, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेर लिंबगाव पोलीस त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी झाडाला गळफास घेतलेला त्यांचा मृतदेह खाली उतरवून पंचनामा सुरू केला आहे. शंकर क्षीरसागर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.