
मणिपूरमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा हिंसाचार उफाळून आला. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील नोंगसुम हिल्सजवळील उयुमपोक भागात संशयित कुकी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मैतेई-कुकी समुदायामधील तणाव पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या हत्यांनंतर तीव्र निषेध व्यक्त केला जात असून, इम्फाळ शहर पूर्णपणे ठप्प झाले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा हल्ला झाला. पीडित व्यक्ती लाकडे गोळा करण्यासाठी इम्फाळ पूर्व आणि कुकीबहुल कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेजवळील भागात गेल्या असता त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळते. अरुबम रोनिल (35), लैरेनलाकपाम इनाओबी (44) आणि क्षेत्रिमायुम सुशील (32) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. तर मेइसनाम सोमेंद्रो (55), बोन्सन खिंगद्राम (45) आणि न्गांगोम सुरज (22) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर इम्फाळमधील राज मेडिसिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































