
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी येथील समाजकल्याण खात्याअंतर्गत जात पडताळणी विभागातील अनेक किस्से आता दररोज समोर येत आहेत. जात पडताळणीच्या घोटाळ्याची व्याप्तीही वाढत आहे. दररोज नवनवीन आरोपी उघडकीस येत असल्याने या घोटाळ्याचे हात समाजकल्याण विभागाच्या मंत्रालयापर्यंत पोहचले असल्याची दाट शक्यता तपास यंत्रणेला आहे.
परजिल्ह्यातील नागरिकांची जात पडताळणी सुद्धा परभणी जिल्ह्यात झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मागील तीन वर्षात हजारो जात पडताळणी प्रमाणपत्रे परभणीतून देण्यात आली आहेत. या सर्व प्रमाणपत्रांची आता तपासणी होणार आहे. आजपर्यंत आठवडाभरात पोलिसांनी २५ लोकांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यांचे जवाब घेण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरु आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गील या तरुण तडफदार व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे तपास असल्यामुळे या प्रकरणातील जात पडताळणी कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे, अॅड. के.बी. सिद्दीकी, मुख्य एजंट अबरार यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बनावट जात पडताळणी प्रकरणी थेट तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणातील गांभिर्य समजून घेवून पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी याचा तपास आयपीएस अधिकारी संदीप गिल यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे कारवाई योग्य दिशेने होत आहे. बुधवारपर्यंत संबंधीत १८ लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज पून्हा ७ लोकांना नोटीसा बजावून त्यांचे जवाब घेण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणातील ज्या आरोपीकडे घरावरील धाडीत जात पडताळणी संबंधीत कागदपत्रे सापडली आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत यातून सुटका दिसून येत नाही. रेशन घोटाळा ज्या प्रमाणे तपासाची चक्रे फिरताना वाढत गेला, त्याच पद्धतीने या जात पडताळणीच्या घोटाळ्याची सुद्धा व्याप्ती वाढत आहे. दररोज नवनविन आरोपी उघडकीस येत असल्याने या घोटाळ्याचे हात समाजकल्याण विभागाच्या मंत्रालयापर्यंत पोहचले असल्याची दाट शक्यता आहे.
मागील तीन वर्षापासून परभणी येथील जात पडताळणी विभागातून अनेक खऱ्या-खुऱ्या मागासवर्गीयांना रितसर प्रस्ताव दाखल करुनही जात पडताळणी मिळाली नाही. परंतु परजिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा हेराफेरीने परभणीतील जात पडताळणी विभागातून प्रमाणपत्रे मिळाली आहेत. अर्थात यातून मोठी आर्थिक कमाई संबंधीत अधिकाऱ्यांना व एजंटांना झाली. संबंधीत एजंटाचे जाळे निव्वळ परभणी पुरते मर्यादीत नसून त्याचे नेटवर्क संपूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जात पडताळणी विभागापर्यंत कार्यरत असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षापासून हा जात पडताळणी घोटाळा होत असल्याची केवळ चर्चा झाली. मात्र पुढाकार घेऊन कोणीही अधिकारी प्रशासकीय पातळीवर हा घोटाळा संपविण्यासाठी पुढे येत नव्हता. शेवटी परभणीचे तरुण तडफदार कर्तव्यदक्ष तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी या लोकशाही मुल्यांना घातक ठरणाऱ्या व घटनाविरोधी बनावट जात पडताळणी विरुद्ध स्वत: पोलिसात जावून लेखी तक्रार दिली. तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांना तपासाची संधी होती. परंतु कोतवाली पोलिसांकडून कारवाई अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी कोतवाली पोलिसांचा तपास काढून घेतला.
प्राप्त माहितीनुसार कोतवाली पोलीस आणि आरोपीमध्ये तडजोड होण्याची शक्यता दिसून आल्यानेच या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी संदीप गिल यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या प्रकरणात महसूल, समाजकल्याण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी गुंतले असल्याने हे प्रकरण राज्यस्तरावर चर्चेचा विषय बनले आहे.
तहसील कार्यालयातील नोंद वहीत खाडाखोड
परभणी तहसील कार्यालयातील नोंद वहीत खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीतील गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी आठवड्याभरापासून फरार आहेत. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन संबंधीत नोंदवहीत खाडाखोड करीत बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ११ ठिकाणी छापे टाकून ६ नोव्हेंबर रोजी पर्दाफाश केला होता. गुन्हा दाखल झालेले आरोपी आठवडाभरापासून मोकाट आहेत. या प्रकरणात पोलिसांनी ६ रोजी रात्री सय्यद इलाही व शेख शफाहेद शेख फारुख या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार सोमवारी या दोन्ही आरोपींना पून्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायायलयाने त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बाबाजानी दुर्राणी यांची मागणी
पाथरी येथील आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या प्रकरणाचे धागेदोरे थेट जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयापर्यंत असून मुख्य आरोपी वंदना कोचुरे असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्या व्यक्ती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय परिसरात सातत्याने वावरत असून या कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी, अशी मागणीही आमदार दुर्राणी यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
































































