परीक्षा न घेता 35 हजार विद्यार्थी जाणार पुढील वर्गात

कोरोना आजाराने थैमान घातल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने सर्व माध्यमाच्या शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर देशपातळीवर 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लावली गेली. त्यामुळे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा न घेता सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनावर या विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षकांना तयार करावा लागणार असुन सेलू तालूक्यातील 35 हजार 204 विद्यार्थी वार्षिक परीक्षा न देता पुढील वर्गात जाणार आहेत.

सेलू तालूक्यात जिल्हा परीषदेच्या 112 शाळा तर खाजगी माध्यमाच्या सर्व 76 शाळा आहेत. सेलू तालुक्यात जिल्हा परिषदेचे 24 हजार 105 तर खाजगी शाळेतील 11 हजार 099 विद्यार्थी असे एकुण 35 हजार 204 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्वितीय सत्र परीक्षेच्या तोंडावर या शाळांना सुट्टी देण्यात आली असून 1 ली ते 8वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा ही रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. असे असले तरी आरटीई नियमानुसार 1 ली ते 8 वी मधील विद्यार्थ्यांना मुल्यमापनात पास, नापास असा निकष नसल्याने सर्वच जण वरच्या वर्गात जाण्यास पात्र असतात. वर्षभर साधन तंत्रानुसार घेण्यात आलेल्या चाचण्या व विशेषतः प्रथम सत्रात केलेले आकस्मिक मुल्यमापनात आकारिक व संकलित अशा दोन पध्दतीने लेखी व तोंडी मुल्यमापनाची विद्यार्थी निहाय नोंद शिक्षकांनी केलेली आहे. त्यामुळे या वर्षभराच्या नोंदी वरून शिक्षकांना यावर्षीचा निकाल तयार करावा लागणार आहे. तो निकाल तयार करण्यासाठी काही आडचणी शिक्षकांना येणार नाहीत आणि शिवाय परीक्षा नसली तरी तसा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काही परीणाम होणार नाही असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगितले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या