मालवण तालुक्यातील पराड नदी किनाऱ्याचा भाग खचला, घरांना धोका

गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे मालवण तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे नदीकिनारीपासून काही अंतरावर वस्ती असलेली घरेही भीतीच्या छायेत आहेत. नदीकिनाऱ्या जवळील भाग अचानक खचल्याने त्याठिकाणी स्थानिक ग्रामस्थांची होडी बुडण्याच्या मार्गावर होती. ती होडी इतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढली.

दरम्यान, घटनास्थळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भेट देत पाहणी केली. आमदार वैभव नाईक तसेच मालवण तहसीलदार यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांनी बजेटमध्ये धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर करून आपणास कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तोपर्यंत तात्पुरती उपाय योजना करता येईल याबाबत संबंधित खात्याशी चर्चा करून आपण प्रत्यक्ष भेट देऊ. अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्फत आमदार नाईक यांनी दिली. तसेच मालवण तहसीलदार यांनी पेंडूर तलाठी यांना घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून अहवाल पाठवण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शिवसेना विभाग प्रमुख कमलाकर गावडे, शाखाप्रमुख संतोष नागवेकर, शाखाप्रमुख निलेश हडकर, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, अक्षय भोसले, विजय पालव, प्रदीप आवळेगावकर, आनंद आवळेगावकर, प्रभाकर नागवेकर, प्रकाश सहदेव नागवेकर, रामचंद्र नागवेकर, अंकुश आवळेगावकर, सर्वेश नागवेकर, दीपश्री आवळेगावकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.