पाटणमधील युवतीच्या हत्येचा साडेतीन वर्षांनी उलगडा, अंधश्रद्धेतून खून केल्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने (वय 18) या महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेल्या हत्येच्या घटनेचा तब्बल साडेतीन वर्षांनी पोलिसांनी उलगडा केला. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही हत्या अंधश्रद्धेतून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

करपेवाडीच्या शिवारात 22 जानेवारी 2019 रोजी ही घटना उघडकीस आली होती. भाग्यश्री हिचा मृतदेह त्यादिवशी दुपारी गावालगतच्या शिवारात गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आला होता. भाग्यश्री ही तळमावले येथील महाविद्यालयात शिकत होती. त्यादिवशी सकाळी कॉलेजमधून परीक्षेचे रिसीट आणायला जाते असे सांगून ती घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार विविध पातळय़ांवर पोलिसांनी तपास केला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता.

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 35 ठिकाणी तपास केला. सव्वाशेहून अधिक जणांचे जबाब नोंदवले. त्यामध्ये कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थिनी, मैत्रिणी, मांत्रिक आदींचा समावेश होता. संशयाची सुई भाग्यश्रीच्या कुटुंबीयांभोवती फिरत असल्याने त्यावेळी तिच्या वडिलांना अटकही केली गेली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटकाही झाली. गुन्ह्यांवर नेमकेपणाने प्रकाश पडावा, यासाठी संशयिताची नार्को टेस्ट करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. मात्र, काही कारणांमुळे ती झाली नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी या आव्हानात्मक प्रकरणाचा पुन्हा कसून तपास सुरू ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही हत्या अंधश्रद्धेतून, नरबळीतून झाल्याचे बोलले जात आहे. लवकरच पोलिसांकडून या घटनेच्या तपासासंदर्भातील तपशील समोर येईल, असा अंदाज आहे.