‘माझ्याशी पंगा घेऊ नको नाहीतर..’ पहलाज निहलानींचा कंगनाला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री कंगना रणौत हिने पहलाज निहलानी यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. तिच्या आरोपांनुसार, निहलानी यांनी अंतर्वस्त्रांशिवाय फोटोशूट करण्याबाबत सांगितल्याचा दावा तिने केला होता. तिच्या आरोपांना खोडून काढताना माझ्याशी शत्रुत्व घेऊ नकोस, असा इशारा पहलाज निहलानी यांनी कंगनाला दिला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पहलाज निहलानी यांनी कंगनाच्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्याचाउल्लेख कंगना करतेय त्या फोटोशूटवर मी दीड कोटी रुपये खर्च केले होते आणि तीन गाण्यांचं चित्रीकरणही केलं होतं. याच फोटोमुळे तिला महेश भट्ट यांचा गँगस्टर हा चित्रपट मिळाला होता. त्यानंतर ती माझ्या चित्रपटातून बाहेर पडली होती. त्यावेळी तिने गँगस्टरमध्ये काम करण्यासाठी माझ्याकडे विनंतीही केली होती. त्यावेळी मी तिला त्याची परवानगी दिली होती.

माझा चित्रपट हा एक यूथ फिल्म होता. यात काम करण्यासाठी मी अमिताभ बच्चन यांनाही विनंती केली होती. या चित्रपटात कंगना विवाहित दाखवण्यात येणार होती. चीनी कम या चित्रपटासारखी ही कथा होती. कंगना म्हणतेय तसा हा चित्रपट अश्लील नव्हता. मला तशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये रुचीही नाही. त्यामुळे तिने उगाच आरोप करणं बंद करावं. नाहीतर तिच्यावर आरोप करण्यासाठी माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत, असा इशारा नेहलानी यांनी दिला आहे.