अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृती ठेचून काढू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱया विकृती ठेचून काढायलाच हव्यात असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना व्यक्त केले. माटुंगा येथील महापालिकेच्या शाळेत तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेसंदर्भात आमदार उमा खापरे यांनी ही लक्षवेधी सूचना विधान परिषदेत मांडली होती. शालेय विद्यार्थिनींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासंदर्भात एक ठोस धोरण तयार करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ज्या शाळांना त्यासाठी खर्च करणे शक्य नाही त्यांना मदतही दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देणार का? असा प्रश्न यावेळी विचारला. त्यावर मुलींना ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. शशिकांत शिंदे यांनी केवळ कायदे बनवून चालणार नाही तर त्यांची अंमलबजावणीही केली पाहिजे असा मुद्दा यावेळी मांडला. शाळेच्या बसेसवर असलेले चालक आणि मदतनीस यांचे ऑडिट झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यास फडणवीस यांनी होकार दिला.