दादरच्या फूल बाजारात प्लॅस्टिक पिशव्या, व्यापाऱ्यांकडून 35 हजारांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिकची वेष्टने व नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवनवर बंदी असूनही दादरच्या फूल बाजारात व भाजी बाजारात खुलेआम वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी धडक कारवाई करून दुकानदार व व्यापाऱ्यांना तब्बल 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला तर 144 किलो प्लॅस्टिकचा माल जप्त केला. दादर परिसरात अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

फुलांची सजावट, बुके यांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी असूनदेखील दादर परिसरात पहाटे सुरू होणाऱ्या घाऊक फूल बाजारात प्लॅस्टिक पिशव्यांचा प्लॅस्टिक वेष्टन,नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवन याचा सर्रास वापर केला जात असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाला मिळाली. दादरच्या भाजी मार्केटमध्येही प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने पहाटे 5 वाजता दादरच्या फूल बाजार व भाजी मार्केटमध्ये धडक मोहीम हाती घेऊन विक्रेत्यांकडून 35 हजार रुपयांचा दंड व 144 किलो प्लॅस्टिकचा माल जप्त केला.

दादरच्या फूल आणि भाजी मार्केटमध्ये बंदी असतानाही खुलेआम प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक वेष्टन, नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवनची विक्री होत असल्याने ही धडक कारवाई झाली. या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी देविदास कोपरकर, क्षेत्र अधिकारी दर्शन म्हात्रे, संदीप पाटील व महापालिकेचे निरीक्षक रमेश घाडगे आदींची भाग घेतला.