
सामना प्रतिनिधी । पुणे
प्लॅस्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंमुळे पारंपरिक वस्तूंची मागणी कमी झाली होती. मात्र, प्लॅस्टिकबंदीमुळे आता पानांपासून तयार कलेल्या पारंपरिक द्रोण आणि पत्रावळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक पत्रावळींना सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, काही व्यावसायिकांनी प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यास सुरुवात केली असून ताट, वाट्यांना प्लॅस्टिकऐवजी रबराचे आवरण लावण्याला सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी झाडांच्या पानांपासून पत्रावळी तयार केली जायची. पिंपळ व सागाची पाने वापरून तयार करण्यात येणाऱ्या या पत्रावळीला ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागांतही चांगली मागणी होती. परंतु, मध्यंतरीच्या काही वर्षांमध्ये आलेल्या प्लॅस्टिक ताटांमुळे या पत्रावळींना नामशेष होण्याची वेळ आली होती. आता राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामुळे अनेक जण पत्रावळी बनविण्याचा व्यवसायाकडे वळू लागले आहेत. झाडांच्या पानांची जागा कागदाने घेतली. मशीनच्या साह्याने कागदाच्या पत्रावळ्या तयार होऊ लागल्या. त्यामुळे पानाऐवजी कागदापासून बनविलेल्या पत्रावळ्या ‘स्टॅन्डर्ड’ म्हणून स्वीकारल्या जाऊ लागल्या. कालांतराने हे प्रमाण वाढतच गेल्याने या व्यवसायातही स्पर्धा निर्माण झाली. मात्र, प्लॅस्टिकच्या ताट-वाट्या पानांच्या पत्रावळींच्या तुलनेत स्वस्त आणि टिकाऊ आहेत. त्यामुळे सर्वांनी प्लॅस्टिक पत्रावळीच्या व्यवसायाकडे मोर्चा वळविला. परिणामी पानांच्या पत्रावळी व व्यवसाय अडचणीत आला. मात्र, प्लॅस्टिकबंदीमुळे लोप पावलेल्या पानांच्या पत्रावळीला पुन्हा मागणी आली आहे.
सध्या पिंपळ, साग, पळस, सुपारीच्या पानांच्या पत्रावळीच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, पानांच्या पत्रावळींना काही नैसर्गिक मर्यादा असून, कच्च्या मालाची कमतरता असल्याने मागणीनुसार पुरवठा शक्य नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. बाजारामध्ये पळसाची पाने, सुपारीच्या पानांपासून तयार करण्यात येणाऱ्या पत्रावळींच्या मागणीमध्ये वाढ झाली असून ताट ६५० रुपये शेकडा, तर वाट्या २५० रुपये शेकडा दराने बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पानांच्या पत्रावळी व्यावसायाला पुन्हा भरभराट आली आहे. पत्रावळी हा घरबसल्या आणि कमी खर्चामध्ये करता येणारा व्यवसाय असल्याने अनेक जण हा व्यवसाय करतात. त्यासाठी लागणारा कच्चा माल कोकण, बंगळुरू, तमिळनाडू येथून कच्चा माल आणला जातो. पानांच्या पत्रावळीची मागणी वाढल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी द्रोण करण्याचे थांबविले आहे. मुंबई, पुणे येथून द्रोण आणून त्याची विक्री होत आहे.
खर्चाबरोबरच उत्पादनही वाढले
काही महिन्यापूर्वी कागदाचा दर ३२ रुपये होता. सध्या हाच दर प्रतिकिलो ४२ ते ४५ रुपये आहे. वीज दरामध्येही ३० टक्वे वाढ झाली आहे. पत्रावळी विक्रीचा काही महिन्यांपूर्वीचा दर १२० रुपये होता. तो सध्या १४० ते १५० रुपये शेकडा इतका आहे, असे कागदी पत्रावळींचे वीर येथील व्यावसायिक हणुमंत क्षीरसागर यांनी सांगितले.
बचत गटांना चांगले दिवस
पत्रावळी व्यवसाय चांगला चालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक बचत गटांनी या व्यवसायात पदार्पण कले. मध्यंतरी अनेक बचत गटांच्या महिला या व्यवसायात उतरल्या. मात्र, सध्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे व्यवसाय तोट्यात सुरू आहे.
गेल्या तीन वर्षांपासून मी सुपारीच्या पानांपासून पत्रावळी तयार करतो. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामुळे या व्यवसायाला पुन्हा उठाव आला आहे. हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला आहे. पावसाळ्यामध्ये पान सहज उपलब्ध होत नसल्याने पानांच्या पत्रावळी करताना अनेक मर्यादादेखील येतात. याचाही विचार आपल्याला करावा लागेल.- प्रद्युम्न कुलकर्णी, (व्यावसायिक, पुणे)






























































