प्लॅस्टिकबंदीची कारवाई तीव्र होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यात २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीची १०० टक्के अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेकडून सर्व २४ विभागांत छापे टाकून धडक कारवाई सुरू आहे. दुकाने-व्यावसायिकांवर सुरू असलेल्या कारवाईमध्ये दररोज एक लाखापेक्षा जास्त दंड वसूल केला जात आहे. आगामी काळात ही कारवाई तीक्र करण्यासाठी आणखी ६१ इन्स्पेक्टर तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे आता एकूण ३१० निरीक्षकांकडून प्लॅस्टिकबंदीविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

पर्यावरणरक्षणासाठी राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर कारवाईसाठी पालिकेने निरीक्षकांची फौज तयार केली आहे. मार्केट, परवाना विभाग आणि आस्थापना विभागातून या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कारवाईचे अधिकार दिलेल्या निरीक्षकांची नावे आणि मोबाईल क्रमांक पालिकेच्या वेबसाइटवर देण्यात आले आहेत. यामध्ये आता परवाना विभागातील ६१ निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. निळ्या रंगाचा कोट आणि काळ्या रंगाची टोपी घातलेल्या या निरीक्षकांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली.

गेल्या पाच दिवसांतील कारवाई
तारीख       तपासणी         दंड         जप्त प्लॅस्टिक
३ जुलै        ३२९१         ४५०००         २.९१० किलो
४ जुलै        ४९७२        १३५०००       ६३.७५ किलो
५ जुलै        ४०९१        १७५०००      १८७.०३ किलो
६ जुलै        ४०५३        १३५०००      ८५.५२० किलो
७ जुलै        ३५५५         २५०००       १९.९२ किलो