मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे फडणवीसांची डावोसवारी हुकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतल्या विविध विकामकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईत येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डावोसवारी हुकली आहे.

स्वित्झर्लंड येथील डावोसमध्ये येत्या 16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या  जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. डावोस परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अधिक महत्त्वाचा वाटतो. शिंदे-फडणवीस सरकार गुंतवणुकीबाबत  किंचितही गंभीर नाही. या सरकारला राजकारणात अधिक स्वारस्य आहे. त्यामुळे या सरकारने डावोसपेक्षा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व दिले. पंतप्रधान मोदी हे स्वभावाने व मनाने चांगले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्याकडे दौऱ्यासाठी पुढील तारीख मागितली असती तर त्यांनी ती दिली असती. मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस हे दोघेही डावोसला जाऊ शकत होते. मात्र या सरकारला राजकारणात अधिक रस आहे. त्यामुळे डावोस बैठकीकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

डावोस परिषद नेमकी काय आहे?

1971मध्ये स्थापन झालेली ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ ही एक खासगी संस्था आहे. या संस्थेचे  मुख्यालय  जिनेव्हात आहे. या संस्थेचे ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जागतिक क्षेत्रिय तसेच औद्योगिक विकासाला चालना देणे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रमचे निमंत्रण देण्यात आलेल्यांना यामध्ये सहभागी होता येते. या परिषदेत जवळपास 2 हजार 500 लोक सहभागी घेतात. त्यात जगातील उद्योगपती, व्यावसायिक, अर्थशास्त्रज्ञांचा समावेश असतो.