डिलिव्हरी बॉय बनून पोलिसांचा ‘ट्रॅप’;ऑर्डर केलेली वस्तू आणायला आले असता आरोपींवर घातली झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टास्कच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूकप्रकरणी दोघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली. रुपेश टक्कर आणि पंकजभाई ओड अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांच्या अटकेसाठी पोलीस डिलिव्हरी बॉय बनून अहमदाबादला गेले. तेथून त्या दोघांना अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत 1 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे.

क्रिश वर्मा हे माटुंग्याच्या व्हीजेटीआय येथे हॉस्टेलमध्ये राहतात. सप्टेंबर महिन्यात ते हॉस्टेलमध्ये असताना त्यांना व्हॉट्सऍपवर मेसेज आला. पार्टटाइम जॉबचे प्रलोभन दिले. पेड टास्कच्या नावाखाली ठगांनी पैसे उकळण्यास सुरुवात केली. टास्कच्या नावाखाली ठगाने त्यांची 2 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी त्याने माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय परदेशी, सहाय्यक निरीक्षक दिगंबर पगार, पवार, जऱहाड, निकम, साळुंखे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. पोलिसांना रुपेशची माहिती मिळाली. रुपेश हा ऑनलाईन साईटवरून खरेदी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तर पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून रुपेश हा दर आठ दिवसांनी नवीन सिमकार्ड खरेदी करायचा. तसेच रुपेश हा ऑनलाईन साईटवरून फक्त कॅश ऑन डिलिव्हरी घेत असायचा. कोणाला पत्ता समजू नये म्हणून रुपेश हा ऑनलाईन साईडवरून तिसरी ऑर्डर केलेली वस्तू घेण्यासाठी त्या कंपनीत जात असायचा. रुपेश हा पार्सल घेण्यासाठी अहमदाबाद येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पगार यांचे पथक अहमदाबाद येथे गेले. तेथून पोलिसांनी रुपेशला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर पंकजभाईला ताब्यात घेऊन अटक केली.

1 कोटी 10 लाख गोठवले
रुपेश हा गेल्या दोन- तीन वर्षांपासून अनेकांची फसवणूक करत आहे. फसवणुकीच्या पैशामध्ये त्याला काही टक्के रक्कम मिळायची. पोलिसांनी आतापर्यंत 1 कोटी 10 लाख रुपये रक्कम गोठवली आहे. तरुणाची फसवणूक केलेली रक्कम ही 20 बँक खात्यांत वर्ग केली होती. गेल्या दोन -तीन महिन्यांत त्या खात्यांत 60 लाख रुपये जमा झाले होते. पोलिसांनी 33 डेबिट कार्ड, 32 बँकांचे पासबुक, 6 मोबाईल, 28 सिमकार्ड, 4 बोगस कंपन्यांचे रबर स्टॅम्प जप्त केले आहेत.