न्यायाधीशांच्या खुर्चीत बसून सेल्फी काढणे पडले महागात

1

सामना ऑनलाईन । उमरिया 

सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसलेले सेल्फीचे भूत वर्दीतल्या पोलिसांच्याही मानगुटीवर बसलेले दिसते. मध्य प्रदेशमध्ये न्यायाधीशांच्या खुर्चीत बसून सेल्फी काढणे प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाला महागात पडले. वरिष्ठ न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून सेल्फी काढल्याप्रकरणी त्या पोलिसाला तुरुंगाची हवा खावी लागली. राम अवतार रावत (२८) असे पोलीस शिपायाचे नाव असून उमेरिया पोलीस अकादमीतून तो प्रशिक्षण घेत आहे. शनिवारी ही घटना घडली.जिल्हा न्यायाधीशाच्या दालन रिकामे होते. त्या दालनात गेल्यावर राम अवतार खुर्चीत बसला आणि त्याने अनेक सेल्फी घेतले. सेल्फी काढत असताना शक्ती सिंग या शिपायाने त्याला पाहिले आणि पकडले. याची माहिती न्यायालयीन कर्मचाऱयांना दिल्यानंतर पोलिसांना बोलवले गेले आणि त्याला अटक करण्यात आली. न्यायाधीशाच्या खुर्चीत बसण्याचा मान हा न्यायाधीशाचाच असतो. या नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. अटकेनंतर काही तासांनी त्याला जामीन देण्यात आला.