दारू तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नागपूर

दारूची तस्करी करणाऱ्या एका वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले. उपचारादरम्यान पोलिसाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव छत्रपती चिडे असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पहाटे चार वाजताच्या सुमारास आज जिल्ह्यातील मौशी चोरगावजवळ पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार घडला.

पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे व त्यांचे सहकारी रात्री चारच्या सुमारास मौशी चोरगावजवळ पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ढोरपामार्गे अवैध दारू तस्करी करणारी स्कॉर्पिओ गाडीने त्यांना धडक दिली. आणि स्कॉर्पिओ घटनास्थळावरून पसार झाली. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी चिडेंना ब्रम्हपुरी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाहनामध्ये अवैध दारू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सद्या पोलिसांकडून त्या वाहनाचा तपास सुरू आहे.

पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांनी काही दिवसांतच आपल्या उत्कृष्ट कामगिरीची चमक दाखवली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला होता. याची दखल पोलीस विभागाने घेतली. नुकताच त्यांना उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून गौरवण्यात आले होते.