मीरा रोडमधील एका पोलीस शिपायाने लाईव्ह व्हिडीओ बनवत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सागर अथनीकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याने ही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु बनवलेल्या लाईव्ह व्हिडीओमध्ये मी जीवनाला कंटाळलो असून माझी कोणाच्याही विरोधात तक्रार नसल्याचे सांगितले आहे.
सागर हा मूळचा सांगलीच्या जतमधील बेळुंखी तालुक्यात राहणारा आहे. 2023 मध्ये तो मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होता. तो अपना घर गृहसंकुलात सहकारी पोलिसासोबत भाड्याने राहत होता. रविवारी संध्याकाळी सागर रूममध्ये झोपायला गेला. मात्र सहकारी पोलीस मित्र त्याला उठवण्यासाठी गेला असता तेथे सागरने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याने खिडकीवर मोबाईलवरून व्हिडीओ शूटिंग केले असल्याचे पाहून सहकारी पोलिसाने ही माहिती काशीगाव पोलिसांना दिली.