
सामना ऑनलाईन । गांधीनगर
देशात स्त्रीया सुरक्षित नाहीत. रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे देशाला बदल घडण्याची अपेक्षा आहे. ज्यांनी तुम्हाला आश्वासने दिली त्यांना प्रश्न विचारायला शिका, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी आज मतदारांना केले. गुजरातच्या गांधीनगरमध्ये झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी प्रियंका गांधी यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. मतदान करताना अत्यंत शांतपणे विचार करून मतदान करा असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. सभेत त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली. पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते त्याचे काय झाले? 2 कोटी नोकऱया देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही त्यांनी सरकारला केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचीही भाषणे झाली.
देशात द्वेषाचे राजकारण
देशात द्वेषाचे राजकारण करून लोकांमध्ये फूट पाडली जात आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. ही निवडणूक तुमचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे जागरूक राहा असेही त्या म्हणाल्या. हा देश तुमचा आहे. त्यामुळे मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्यांना तुम्ही हे प्रश्न विचारू शकता. या दोन महिन्यांत वायफळ मुद्दे मांडले जातील. अशा वेळी तुम्हीच तुमचे भवितव्य ठरवणार आहात हे लक्षात असू द्या, असेही त्या म्हणाल्या.



























































