फॅन्सी फुटवेअर

>> पूजा सामंत

सर्व कामांसाठी एकच पादत्राणे वापरण्याचा काळ आता मागे पडलाय. चप्पल, सॅण्डल, स्निकर्स अशा विविध पादत्राणांना डिझाईन करणाऱया शूज डिझायनरची मागणी वाढतेय. आपल्या पायांतील फुटवेअर आपले व्यक्तिमत्त्व खुलवतात, फक्त त्याची निवड मात्र अचूक असायला हवी.

पाऊस असो किंवा पर्यटनाला जायचं असो किंवा धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा आहे, नोकरीसाठी महत्त्वाची मुलाखत असो, अहो इतपंच काय, खास मित्र-मैत्रिणीचे लग्न आहे, अगदी स्वतः बोहोल्यावर चढताय… एक न दोन, पण पायात अगदी योग्य जोडे-पादत्राणे घातल्याशिवाय तुमचा ‘लूक’ काही पूर्ण होऊ शकत नाही हे निश्चित! पावसात वापरण्यासाठी ‘मान्सून शूज’, पर्यटन म्हणजे खूप चालणं हे त्यासाठी पॅनव्हास -स्निकर्स हवेत, स्वतःचं लग्न असल्यास ‘डिझायनर शूज -अथवा सॅण्डल्स’ हवे, नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचंय मग लेदर शूज हवेत त्याला चकचकीत पॉलिश हवेच. स्पोर्टस्साठी व्हाईट शूज असावेत. पार्टीसाठी खास शूज-सॅण्डल्स हवेतच, ज्यात तुमचं व्यक्तिमत्त्व उठून दिसेल.

पायांचे सौंदर्य, व्यक्तिमत्त्वाला खुलवणारे फुटवेअर्स निवडणे ही आज काळाची गरज आहे. आपल्या कामाच्या दृष्टीने योग्य फुटवेअर निवडणे गरजेचे आहे.

तुमचा जॉब अनेक तास उभे राहणारा असेल तर हाय हिल्स फुटवेअर घालणे योग्य ठरणार नाहीत. म्हणूनच फुटवेअरची खरेदी आपल्या गरजांप्रमाणे करावी. लग्न समारंभात पारंपरिक पेहेरावासोबत स्टाईलच्या फॅन्सी कोल्हापुरी चप्पल्स, मोजडी हा उत्तम आणि ट्रेंडी पर्याय ठरेल.

नव्या-जुन्या पिढीला आकर्षण

अलीकडेपर्यंत स्निकर्स फक्त पर्यटन, स्पोर्टस् इव्हेंट्ससाठी वापरणे हा ट्रेंड होता जो हल्ली लग्न कार्य, इव्हेंट्स, पार्टी अशा खास कार्यक्रमातदेखील विविध रंग आणि स्टाईल्समध्ये वापरण्याचा ट्रेंड सर्वत्र दिसून येतोय. आपल्या फुटवेअरमध्ये विविध प्रयोग करणारा एक फॅशनेबल वर्ग आहे.

मोजडी, स्निकर्स हा ट्रेंड ट्रेंडिंग आहे, ज्यात आराम, टिकाऊपणा, आणि फॅशन असा मिलाफ नव्या-जुन्या पिढीला आकर्षित करतोय.

आवड, आराम आणि फॅशन

प्रसिद्ध फुटवेअर डिझायनर अपराजिता तूर हिने फुटवेअर ट्रेंड्सबद्दल माहिती दिली. अपराजिता म्हणते, विविध फुटवेअरची फॅशन तशी प्राचीन काळापासून चालत आलीये फक्त काळ जसा पुढे गेला, तसा आधुनिक तंत्रज्ञान, नवनिर्मितीचा ध्यास, काळाची गरज अशा अनेक कारणांमुळे फुटवेअरची मागणी वाढतच गेली. सध्याच्या ट्रेंडचा विचार करता ‘क्लोज्ड शूज, नी हाय बुट्स, क्लासिक ऑक्सफर्ड ड्रेस शु सिल्व्हेट्स, पॉवर ड्रेसिंग करणे हे कॉर्पोरेट जगतात आवश्यक मानले जाते, या पेहरावाला शोभेल असे फुटवेअर अनेक प्रकारात उपलब्ध आहेत. ज्यांना हाय हिल्स नकोत, पण स्टायलिश सॅण्डल्स हवेत, ज्यांना पेन्सिल हिल्समध्ये हवेत ते तसेही उपलब्ध आहेत, एकूणच काय तर आपली आवड, सोय आणि फॅशन यांची सांगड घालून हवे तसे फुटवेअर वापरण्याचा ट्रेंड आहे.

एक महत्त्वाची गोष्ट-फॅशन आणि कम्फर्ट लेव्हल यांची सांगड घालायची असल्यास रस्त्यावरील खरेदीला अर्थात स्ट्रीट शॉपिंगला काही पर्याय नाही. दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट, वांद्रे लिंकिंग रोड, लोखंडवाला मार्केट, बोरिवली मार्पेट अशा विविध स्ट्रीट मार्पेट्समध्ये फॅन्सी फुटवेअरची व्हरायटी पाहण्यास मिळते. मी स्वतः विविध वयोगटासाठी, आकारात आणि कम्फर्ट-आवड लक्षात घेऊन फुटवेअर डिझाईन करते. फुटवेअरची फॅशनदेखील पुनः पुन्हा जन्माला येते. फुटवेअरमध्येसुद्धा क्लासिक स्टाईल्स उपलब्ध आहेत. रंगांचा विचार केल्यास-ब्लॅक, व्हाईट, क्रीम, रेड अशा 4-5 रंगांचे सॅण्डल्स महिलांच्या कलेक्शनमध्ये असावेत. प्रत्येकीकडे लाल, काळा, क्रीम आणि सफेद असे 4-5 कॉमन ड्रेस असतात त्यावर हे सॅण्डल्स उपयुक्त ठरतात. प्लॅटफॉर्म हिल्सची फॅशन ऐंशीच्या दशकात खूप चलनात होती, त्या फॅशनचा पुनर्जन्म वारंवार होत गेला. आपल्या गरजेप्रमाणे फुटवेअर तयार करून घेण्याचा ट्रेंड आहे. फॅशन विश्वात तुम्ही जे कपडे घालाल, जे फुटवेअर वापराल त्यात आत्मविश्वास असला पाहिजे. कधी अचानक चप्पल, सॅण्डल, शूज तुटतात, पण अशा फाटलेल्या तुटलेल्या शुजला पायात आत्मविश्वासाने घालणे हासुद्धा एक ट्रेंडच!