Poonch attack हृदय पिळवटून टाकणारी बातमी; कारगिलमध्ये वडील, तर पुंछमध्ये मुलगा शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी लष्कराच्या वाहनावर भीषण हल्ला झाला. पुंछ-जम्मू मार्गावरून इफ्तारसाठी फळं घेऊन जात असताना दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पाच जवान शहीद झाले. यातील एक नाव लान्सनायक कुलवंत सिंग याचेही होते.

जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कुलवंत सिंग शहीद झाल्याची बातमी ऐकताना संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. त्यांचे पार्थिव गावी पोहोचले असून प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. हजारोंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुलवंत सिंग यांच्याआधी त्यांच्या वडिलांनीही देशासाठी बलिदान दिले आहे. 1999मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात ते सहभागी झाले होते आणि देशासाठी हौतात्म्य पत्करले होते. कारगिलमध्ये वडिलांनी हौतात्म्य पत्करल्याच्या 11 वर्षांनी कुलवंत सिंग लष्करामध्ये भरती झाले. आज वडिलांप्रमाणे त्यांचा मुलगाही देशासाठी शहीद झाला.

कुलवंत सिंग हे पंजाबमधील चाडिक गावचे रहिवासी होते. त्यांना दीड वर्षांची मुलगी आणि तीन महिन्यांचा मुलगा आहे. घर सोडण्यापूर्वी मुलाने आपण सुखरूप असून चिंता करू नको, लवकरच परत येईल, असे म्हटल्याचे त्यांच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हे बोलताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या, तर कंठ दाटून आला होता.

सामना अग्रलेख – कश्मीरात हल्ले सुरूच मोदी-शहा, बोला!

गावचे सरपंच गुरचरण सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुलवंत सिंग याच्या कुटुंबाला सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये कुलवंत सिंग एकमेव कमावती व्यक्ती होती. त्यांच्या वडिलांनीही देशासाठी बलिदान दिले आणि त्यांनी देखील देशासाठीच वीरमरण पत्करले. त्यामुळे सरकारने त्यांच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पूंछमध्ये सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम, 2 हजार कमांडोंचे पथक दहशतवाद्यांच्या मागावर