
कश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात सैनिकांच्या एका ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून या हल्ल्यात एकूण 7 दहशवतवादी सामील होते असा अंदाज आहे. दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्याशी निगडीत विस्तरृत माहिती गुप्तचर खात्याने गृह मंत्रालयाला दिली आहे.
बीजी सेक्टर इथे झालेल्या या हल्ल्यात स्टिकी बॉम्बचा वापर करण्यात आला होता. कटरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हा हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी जवानांच्या ट्रकवर 36 गोळ्या झाडल्या होत्या. या गोळ्या स्टीलच्या बनलेल्या होत्या. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यातील 3 दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी 2 हजार कमांडोंची तुकडी तैनात करण्यात आली आहे. शोध मोहिमेमध्ये ड्रोन आणि हेलकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे. दहशतवादी दिसताक्षणी त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले जवान हे राष्ट्रीय रायफल्सचे होते. गेल्या काही वर्षात जम्मू कश्मीरात ऑपरेशन ऑल आऊट सुरू असून यामध्ये राष्ट्रीय रायफल्सचा मोठा वाटा आहे. सुरुवातीला लष्कराच्या वाहनावर वीज कोसळली, वाहनामध्ये रॉकेल असल्याने आग भडकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता, मात्र सायंकाळी लष्कराच्या नॉदर्न कमांडने हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन लष्कराचा ट्रक पूंछ जिल्हय़ातील भीमबर गली येथून संगिओतकडे जम्मू महामार्गावरून जात होता. मुसळधार पाऊस आणि दाट धुके पसरले होते. त्याचाच फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा मारा केला. लष्कराच्या ट्रकने पेट घेतला आणि आग भडकली.
हा हल्ला आपणच केल्याचे पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने म्हटलं आहे. ही दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याचं सांगितलं जात आहे. या संघटनेने अनेकदा हिंदुस्थानी सैन्याला आणि सरकारला धमक्या दिल्या आहेत. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी स्टिकी बॉम्बचा वापर केला आङे. हे बॉम्ब पाकव्याप्त कश्मीरमध्ये बनवण्यात येत असून ते बनवण्याचे प्रशिक्षण पाकिस्तानी सैन्याचे निवृत्त अधिकारी देत आहेत. हे बॉम्ब बनवताना त्यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. लोखंडी वस्तूला हा बॉम्ब चुंबकाच्या सहाय्याने चिकटवला जातो. बॉम्ब हा टायमरने नियंत्रित केला जात असल्याने बॉम्ब चिकटवून दहशतवाद्यांना पळून जातात येतं. हा बॉम्ब साधारणपणे इंधनाच्या टाकीला चिकटवतात जेणेकरून जास्तीत जास्त नुकसान होऊ शकेल.
























































