राज्यपालांकडून विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपालांकडून 12 आमदार नियुक्त करण्याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, आज पुन्हा एकदा ही याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यपालांकडून विधानपरिषदेवर 12 आमदार नेमण्यासंबंधी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेविरुद्ध केलेली कृती याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका ऑगस्ट 23 मध्ये दाखल करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांसमोर सिरीयल नंबर 20 ला सुनावणी होणार होती. पण ही याचिका आज रिच न झाल्यामुळे सुनावणी आज झाली नाही. याबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

युक्तिवादासाठी वेळ व तारीख निश्चित करण्यात यावी असा अर्ज याचिकाकर्ते सुनील मोदी यांचे कडून दाखल करण्यात आला होता. यावरही अजून काही निर्णय झालेला नाही. याबाबतची माहिती शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली आहे.

31 जुलै 23रोजीच्या आदेशाप्रमाणे गव्हर्नर ऑफिस व महाराष्ट्र राज्य यांनी प्रतिज्ञापत्र 19 सप्टेंबर 23 रोजी उच्च न्यायालयात दाखल केले आहे. तसेच यावर याचिकाकर्ते सुनील मोदी यांनीही रि जॉइंडर 4 ऑक्टोबर 23 रोजी दाखल केले आहे.