
जामिनावर असताना फरार झालेल्या आरोपीला तब्बल 8 वर्षांनी सीबीआयने अटक केली. या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. खटला अंतिम टप्प्यात असताना आरोपीने पुराव्यांशी छेडछाड करणे व साक्षीदारांना धमकावणे अशक्य आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सीबीआयला चांगलाच झटका दिला आहे.
सतीश पुजारी असे या आरोपीचे नाव आहे. पुजारीविरोधातील खटला अंतिम टप्प्यात आहे. आता त्याला जामीन मंजूर केल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो व साक्षीदारांना धमकावू शकतो, असा दावा सीबीआयने केला होता. हा दावा फेटाळून लावत न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठाने पुजारीला एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. खटल्याची सुनावणी तहकूब करण्याची मागणी करू नये. सीबीआयच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाऊ नये, अशा अटी न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातल्या आहेत.
काय आहे प्रकरण
कोटय़वधी रुपयांच्या बँक घोटाळय़ाचा पुजारीवर आरोप आहे. मुंबईसह अन्य ठिकाणी पुजारीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 2010 मध्ये त्याला अटक झाली. मुंबईतील गुह्याचा तपास सीबीआय करत आहे. पुजारीला त्या वेळी जामीनही मंजूर झाला, पण 2015 पासून खटल्याच्या सुनावणीला पुजारी आलाच नाही. फरार झालेल्या पुजारीला 2023 मध्ये सीबीआयने अटक केली. जामिनासाठी पुजारीने याचिका केली होती.
पुजारीचा युक्तिवाद
जामिनावर असताना पुजारी फरार होता. तो सुनावणीला हजर नव्हता हे सत्य आहे. आता तो खटल्याला संपूर्ण सहकार्य करेल. न्यायालयाने अटी घालून जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद वरिष्ठ वकील नितीन प्रधान यांनी केला.
सीबीआयचा दावा
पुजारीविरोधात तीन गुह्यांची नोंद आहे. बंगळुरू येथील गुह्यात तेथील न्यायालयाने पुजारीला जामीन नाकारला आहे. मुंबईतील गुह्याचा खटला अंतिम टप्प्यात आहे. 64 पैकी 60 साक्षीदारांची साक्ष नोंदवून पूर्ण झाली आहे. त्याला जामीन दिल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. त्यामुळे जामीन मंजूर करू नये, असा दावा सीबीआयने केला.
न्यायालयाचे निरीक्षण
पुजारी जामिनावर असताना फरार होता. आता त्याला अटक झाली आहे. पुजारी खटल्याला हजर राहील याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी कठोर अटी घालता येतील. खटला अंतिम टप्प्यात असल्याने कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे जामीन मंजूर केला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
























































