हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण हे कळणे गरजेचे! यापुढे अधिक सतर्क राहू!!

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी हल्ला करण्यात आला होता. हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोर अटकेत असला तरी त्याने हे कृत्य कोण्याच्या सांगण्यावरून केले हे कळणं गरजेचे असल्याचे प्रज्ञा सातव यांनी म्हटले आहे. हल्ला करणाऱ्याशी माझे वैमनस्य नव्हते, मी त्याला ओळखतही नाही. त्यामुळे त्याने हा हल्ला का करावा हा प्रश्नच आहे. यामुळे त्याने कोणाच्या इशाऱ्यावरून माझ्यावर हल्ला केला हे कळणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या.

काय घडलं होतं?

प्रज्ञा सातव यांनी सांगितले की त्या रोज 3-4 गावांना भेटी देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधत असतात. बुधवारी त्या बेलथर, गोतेवाडीही गावांचा दौरा करून कसबा धावंडा या गावात गेल्या होत्या. गावात पोहोचल्यानंतर हल्लेखोर त्यांच्या गाडीजवळ आला आणि गाडीतून उतरत असताना त्याने प्रज्ञा सातव यांना विचारलं की गाडीत मॅडम कोण आहेत ? काहीतरी गडबड असल्याचं कळाल्याने प्रज्ञा सातव पुन्हा गाडूत बसल्या आणि त्यांनी दार लावून घेतलं. तिथून थोड्या अंतरावर त्या उतरल्या आणि त्यांनी गावातील लोकांशी बोलायला सुरुवात केली. तिथेही हल्लेखोर पोहोचला होता. हल्लेखोराने अंधाराचा फायदा घेत माझ्यावर पाठून हल्ला केला असे प्रज्ञा सातव यांनी सांगितले. यानंतर ग्रामस्थांनी हल्लेखोराला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हल्ल्यामागे मोठी ताकद असू शकते

प्रज्ञा यांनी म्हटले आहे की, हल्लेखोर म्हणतोय की हे मी केलेलं नाही, मला हल्ला करायला सांगितला होता. त्यामुळे त्याच्या पाठीमागे कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. या हल्ल्यामागे मोठी ताकद असू शकते. आमदारावर आणि ते देखील महिला आमदारावर हल्ला करणं हे मोठं पाठबळ असल्याशिवाय होऊ शकणार नाही. आम्ही यापुढे अधिक सतर्क राहू, आणि पक्षाचे काम करत राहू.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. सदर घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून हिंगोली पोलीस अधीक्षकांकडे आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. गृहविभागाने यात तातडीने लक्ष घालावे आणि विद्यार्थी तसेच महिला यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या बीट मार्शल, दामिनि पथक अधिक सक्षम करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय प्रज्ञा सातव यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि आरोपीवर कडक कारवाई करावी असे त्या म्हणाल्या.