ठसा – डॉ. दादा गोरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेवानिवृत्त प्राध्यापक, लेखक, समीक्षक, प्रकाशक, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह तथा साहित्य महामंडळाचे सदस्य अशी बहुआयामी ओळख डॉ. दादा गोरे यांची सांगितली जाते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असाही लौकिक आहे. ते खरेच आहे. आज (24 नोव्हेंबर) ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. याच औचित्याने ‘साहित्य आस्वाद आणि चिंतन’, ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी’, ‘स्त्र्ायांचे समकालीन साहित्य’ या तीन ग्रंथांसह ‘वाङ्मयीन प्रवृत्ती तत्त्वशोध’ या गौरव ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे  प्रकाशन राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. मसापचे अध्यक्ष प्राचार्य काwतिकराव ठाले पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. गोरे सरांचा अमृत महोत्सवी समारंभ व त्यानिमित्ताने वाङ्मयीन ग्रंथाचे प्रकाशन हा योग त्यांच्या विद्यार्थ्यांनी घडवून आणला आहे. लेखन, संपादन, समीक्षा, ललित लेखन ही तर त्यांची ओळख आहेच. ती त्यांनी कायम ठेवतच प्रकाशन क्षेत्र व संस्थात्मक कार्यात वैविध्यपूर्ण कार्य करून ठेवले आहे. प्रदीर्घ काळ संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख होते. वर्गातला अभ्यासक विद्यार्थी असो की वर्गाबाहेरचा आस्वादक विद्यार्थी, नवे कार्य करण्यासाठी त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन लाभत असे. अॅकेडमी काwन्सिलचे सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य विश्वकोश मंडळाचे अभ्यागत संपादक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. सुमारे दीड दशकापासून मराठवाडा साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळ या महत्त्वाच्या साहित्य संस्थांवर त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. लेखक, प्राध्यापक, प्रकाशक आणि संस्थात्मक कार्य, खरे तर ही तीन-चार क्षेत्रं वेगवेगळी आहेत, पण त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवली.

24 नोव्हेंबर 1947 रोजी नाथ महाराजांच्या पैठण नगरीत जन्म झालेल्या दादांचा विविध क्षेत्रांतील झालेला प्रवास हा झपाटून टाकणारा आहे. 1970 साली पाचोड येथील जवाहर विद्यालयात शिक्षक, 1971 साली अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक, 1971 ते 79 पर्यंत संभाजीनगर शहरातील विज्ञानवर्धिनीमध्ये शिक्षक, प्राध्यापक, 1979 ते 2007 पर्यंत शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्रपाठक, मराठी विभागाचे प्रमुख, 2008 ते 2012 पर्यंत नालंदा महाविद्यालयाचे प्राचार्य असा त्यांचा शैक्षणिक प्रवास सांगता येईल. या प्रवासासोबतच त्यांची साहित्य क्षेत्रातही वाटचाल झाली. तीही अधोरेखित करायला हवी. समीक्षा लेखनसंदर्भात त्यांची गोनिदांची प्रादेशिक कादंबरी, ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी, साहित्य समीक्षा आणि आस्वाद, साहित्यरूप, काव्य संवेदन, पुन्हा साहित्यरूप, अनुराधा पाटलांची कविता, आस्वाद समीक्षेचा (समीक्षात्मक ग्रंथसंपदा), आधुनिक भाषा विज्ञान आणि मराठी भाषा (भाषा विज्ञान), कोसळ, पौरुष, कोसळ आणि इतर, अंगठा (कथासंग्रह), नयनपंख (नाटय़लेखन) कोसळ आणि इतर अशी त्यांची साहित्यसंपदा सांगता येते. आधी त्यांची पुस्तके इतर प्रकाशनाने प्रसिद्ध केली. नंतर त्यांनी गोदा प्रकाशन स्थापन करून आपले साहित्य प्रकाशित केले आणि नव्या पिढीतील सकस, दमदार लेखकांचेही साहित्य प्रसिद्ध केले. आजपर्यंतच्या प्रवासात त्यांनी मुक्तेश्वरांचे हरिश्चंद्राख्यान, मराठवाडय़ातील काव्य परिमल, म. फुले यांची कविता, साहित्यलेणी, वेणुसुधा, अभंगवाणी, सगनभाऊ ः लावणी आणि पोवाडे, मराठी संतांचे अभंग, निवडक बखर वाङ्मय, पानिपतची बखर, तीर्थावळीचे अभंग व दमयंती स्वयंवराख्यान ही महत्त्वाची पुस्तके संपादित केली. कुमार भारती, युवक भारती या पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाच्या कार्यात त्यांचे योगदान राहिले. साहित्य महामंडळाचे कार्यवाह हे पद असताना त्यांनी साहित्य महामंडळाचे मुखपत्र असणारी ‘अक्षरयात्रा’ ही अधिक व्यासंगाने संपादित केली. मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, अधिसभेचे सदस्य, मराठी परीक्षा मंडळाचे सदस्य, मराठी अभ्यास मंडळाचे निमंत्रक, विश्वकोश मंडळाचे सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. महत्त्वाचे म्हणजे जवळपास दहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादन केली. वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असो की नव्या पिढीतील लेखक असो, त्यांच्या नवनवीन कार्यासाठी दादा गोरे यांची प्रेरणा असते. साहित्य चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर काwतुकाची थापही असते. एखादाच लेखक कार्यकर्ताही असतो, ते म्हणजे दादा गोरे.

>> प्रशांत गौतम