
सामना ऑनलाईन । सियोल
ईश्वरी आदेश आहे, मला त्याचे पालन करायचे आहे, त्यासाठी मी सांगतो तसे करा, असे सांगत एका पाद्र्याने आठ महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा घटना दक्षिण कोरियाची असून या प्रकरणात न्यायालयाने 75 वर्षांच्या या पाद्र्याला 15 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आपल्यामध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा या पाद्र्याने केला आहे. पीडित महिला मेगाचर्चच्या अनुयायी आहेत. आपल्याकडे दैवी शक्ती आहेत, असा दावा करून या पाद्र्याने ईश्वरी आदेश आहे. त्याचे मला पालन करायचे आहे असे सांगून 75 वर्षांच्या या पाद्र्याने आपल्यावर बलात्कार केल्याचे त्या महिलांनी न्यायालयात सांगितले.
आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे पाद्र्याने भासवल्यामुळे त्याने सांगितलेल्या गोष्टींसाठी तयार झाल्याचे महिलांनी सांगितले. या चर्चला कोणत्याही ख्रिश्चन धर्मसंस्थेकडून मान्यता मिळालेली नाही. या चर्चची स्थापना या पादरीने 12 समर्थकांसह 1982 मध्ये केली होती. आता या चर्चचे रुपातंर मेगाचर्चमध्ये झाले आहे. या चर्चच्या जगभरात 10 हजार शाखा असून अनेक अनुयायी या चर्चशी जोडले गेले आहेत. आपल्याला स्वर्गात स्थान मिळेल या भाबड्या आशेने पीडित महिलांनी पाद्र्यावर विश्वास ठेवल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्या लहानपणापासूनच या चर्चमध्ये येत होत्या. महिला चर्चच्या अनुयायी होत्या आणि त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेत पाद्र्याने त्यांच्यावर बलात्कार केला. ईश्वरी आदेश आहे, असे सांगितल्यावर त्या कोणताही विरोध करणार नाहीत आणि कायद्याच्या कचाट्यातून आपला बचाव होईल असे समजून त्याने या आठ महिलांवर बलात्कार केला. न्यायालयाने त्याला 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

























































