दहावी, बारावी परीक्षेत दहा मिनिटांचा वाढीव वेळ द्या! मुख्याध्यापकांची बोर्डाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी, बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर देण्याचा निर्णय यंदापासून रद्द करण्यात आला आहे. या दहा मिनिटांत विद्यार्थी प्रश्नपत्रिकेचे नीट वाचन करून पेपर कसा सोडवायचा याविषयी विचार करत होते. मात्र, आता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन, अवलोकन तसेच प्रश्न सोडविण्यासाठी वेळेचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वेळ वाढवून द्या, जेणेकरून विद्यार्थी प्रश्नपत्रिकेचे वाचन करू शकतील अशी मागणी होत आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गेल्या काही परीक्षांपासून प्रश्नपत्रिका मोबाइलद्वारे सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. यंदा या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना वाचनासाठी परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियमित वेळेआधी 10 मिनिटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी आणि उत्तरे कशी लिहायची याच्या नियोजनासाठी देण्यात येत होती, परंतु या वर्षी तसे न करता परीक्षेच्या वेळेतच म्हणजे सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता आणि दुपार सत्रात दुपारी 3 वाजता प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परीक्षेच्या वेळेतच प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सुरुवातीची दहा मिनिटे तिचे वाचन करण्यात निघून जाणार आहेत. त्यामुळे पेपर सोडविण्याआधीच दहा मिनिटे कमी होणार आहेत.

एकीकडे कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने आधीच विद्यार्थ्यांच्या लेखनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला होता. तसेच अभ्यासक्रमही कमी करण्यात आला होता. यंदा मात्र प्रचलित वेळेतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचा पेपर वेळेत पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बोर्डाच्या परीक्षेत पेपरफुटीच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी मिळणारी दहा मिनिटे कमी करणे म्हणजे विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यासारखे आहे. बोर्डाने पेपर फुटीला आळा घालण्यासाठी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका आल्यानंतर नीट वाचून, समजून, उमजून व वेळेचे नियोजन करून उत्तरे लिहिण्यास वेळ दिला पाहिजे. – पांडुरंग केंगार, सचिव, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना