नगरची जागा NCPकडे गेल्याने आता खात्री नाही – पृथ्वीराज चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभेच्या नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील तिढा न सुटल्याने काँग्रसमध्ये बंडाळी झाल्याचे शल्य काँग्रेस नेत्यांच्या मनात कायम बोचत आहे. नगरची जागा काँग्रेसकडे असती तर जिंकलो असतो, मात्र ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने जिंकू की नाही माहीत नाही, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते बीबीसी मराठी या वृत्तसंस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्र महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा न सुटल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रसची एकप्रकारे नाचक्की झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या जागेवर ताठर भूमिका घेतली नसती तर हे घडले नसते अशी काँग्रेस नेत्यांची भावना आहे. त्याचीच प्रचिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

विखे पाटील यांनी नगर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले की, ”नगरमध्ये प्रचारासाठी विखे पाटील यांनी जावं. जर ते गेले नाहीत, तर त्यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप होईल.”