तळेगाव-खारघर वीज वाहिनीत बिघाड, मुलुंड, भांडुपसह नवी मुंबई, ठाण्यात दोन तास बत्ती गुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईला वीज पुरवठा करणाऱया महापारेषणच्या तळेगाव-खारघर उच्चदाब वीज वाहिनीत आज दुपारी बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या मुलुंड, भांडुपसह ठाणे आणि नवी मुंबईच्या अनेक भागांतील बत्ती गुल झाली होती. तापमानाचा पारा चढलेला असतानाच दीड-दोन तास वीज नसल्याने नागरिकांचा चांगलाच घामटा निघाला.

महापारेषणची तळेगाव-खारघरदरम्यान 400 केव्हीची उच्चदाब वीज वाहिनी आहे. या वीज वाहिनीच्या माध्यमातून राज्यातील वीज मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी वाहून आणली जाते. दुपारी तापमानाचा पारा जास्त असल्याने मावळ तालुक्यातील किवले गावाच्या परिसरात उच्चदाब वीज वाहिनीच्या खाली झाडांना आग लागल्यामुळे 1.44 वाजता वीज वाहिनी बंद पडली. त्यामुळे मुलुंड, भांडुपसह ठाण्याच्या नौपाडा, पाचपाखाडी, मानपाडा, दिवा, खारघर, सानपाडा, जुईनगर परिसरातील जवळपास पाच लाखांहून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला.

मुंबईवरील अनर्थ टळला

मुंबईला वीज पुरवठा करणाऱया अदानी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू वीज केंद्रात बिघाड झाल्याने सकाळी 7.30 च्या सुमारास 250 मेगावॅटने वीजनिर्मिती घटली. त्याची दखल घेत राज्य भार प्रेषण केंद्राने (एसएलडीसी) तत्काळ टाटा पॉवरच्या वीज केंद्रांना वीजनिर्मिती वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच सकाळी विजेची मागणी कमी असल्यामुळे मुंबईवरील मोठा अनर्थ टळला.