मोरबी पुल दुर्घटना, आरोपपत्रात ओरेवा ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 135 जणांनी आपला जीव गमावला होता. आता घटनेच्या तीन महिन्यानंतर पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.

ओरेवा ग्रुपचे प्रवर्तक आणि अजंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल हे ऑक्टोबरमध्ये ही दुर्घघटना घडल्यापासून बेपत्ता आहेत. गेल्या आठवड्यात त्याच्या अटकेसाठी वॉरंट काढण्यात आले होते. अटक टाळण्यासाठी त्याने 16 जानेवारी रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. पोलीस उपाधिक्षक पी.एस.जाला यांनी मोरबी सत्र न्यायालयात 1262 पानांचे आरोप पत्र दाखल केले. जाला या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, मोरबीमध्ये झुलता पुल अपघाताप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपींव्यतिरिक्त ओरेवा ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेलला चार्जशीटमध्ये दहावे आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर 2022 रोजी घडलेल्या घटनेबाबत मॅजिस्ट्रेट कोर्टाने जयसुख पटेल विरुद्ध अटक वॉरंट आधीच जारी केले आहे. पटेल यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर 1 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

ओरेवा ग्रुपला मोरबी शहरातील मच्छू नदीवर असलेल्या आणि ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाच्या संचालन आणि देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने आपल्या अहवालात फर्मच्या अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले होते. उपकंत्राटदार, तिकीट लिपिक आणि सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे रोजंदारी मजूर यांच्यासह यापूर्वी अटक केलेल्या नऊ जणांसह जयसुख पटेल हे दहावे आरोपी म्हणून नाव देण्यात आले. मात्र या प्रकरणातील आरोपी मोकळे फिरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

या घटनेच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अहवालात असे दिसून आले आहे की,  पुलाच्या नूतनीकरणादरम्यान गंजलेल्या केबल्स, तुटलेल्या अँकर पिन आणि सैल बोल्टकडे लक्ष दिले गेले नाही. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की ओरेवा ग्रुपने पूल लोकांसाठी खुला करण्यापूर्वी त्याच्या लोड-बेअरिंग क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ एजन्सीची नियुक्ती केली नाही.