कोलकात्यातील आर जी कार रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय टास्क फोर्स नेमला. मात्र, या टास्क फोर्सच्या शिफारशी लागू होईपर्यंत डॉक्टरांना अंतरिम संरक्षण द्या, अशी मागणी फेमा अर्थात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात एका निवेदनाद्वारे आज केली. तसेच टास्क पर्ह्समध्ये निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधीचाही समावेश करावा अशी मागणीही केली.
बलात्कार व हत्या प्रकरणात 2 एसीपींसह 3 पोलीस निलंबित
कोलकाता येथील निवासी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्या प्रकरणी देशभरात उद्रेक झाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने आज दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीआयएसएफने आर.जी. कार मेडिकल कॉलेजची सुरक्षा ताब्यात घेतली असून अधिकाऱ्यांनी आज रुग्णालयात जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अली यांनी घोष यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप केला असून ईडीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कायदा करण्याची मागणी वैद्यकीय संघटनांनी, डॉक्टरांनी एनडीए सरकारकडे केली असून आज दहाव्या दिवशीही विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. कोलकाता, दिल्ली आणि अनेक शहरांतील डॉक्टरांनी आज काम केले नाही. एम्स दिल्लीनेही डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक समिती स्थापन केली आहे.