
कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या मिंधे सरकारच्या निर्णयाविरुद्ध बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप दिसून येत आहे. रणजीत आव्हाड या तरुणाने पंत्राटी भरतीचा विरोध करतानाच शिक्षक भरती लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी आज मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी घेऊन आंदोलन केले.
आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रणजीतने मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उडी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. रणजीत हा प्रकल्पग्रस्त आहे. अनेक वर्षे तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, परंतु सरकारदरबारी त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यातच सरकारने आता पंत्राटी पद्धतीने भरतीचा निर्णय घेतल्याने रणजीतचे शिक्षक होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पंत्राटी नको तर कायमस्वरूपी शिक्षक भरती करा, या मागणीसाठी आपण उडी घेतल्याचे रणजीतने सांगितले. पोलिसांनी जाळीवर उतरून मोठय़ा प्रयत्नांनी रणजीतला पकडून सुरक्षित बाहेर काढले. गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक भरती रखडलेली आहे. त्यामुळे शिक्षक होण्यास धडपड करणारे बेरोजगार तरुण आक्रमक झाले आहेत.
यापूर्वी गेल्या 29 ऑगस्ट रोजी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱयांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडय़ा घेतल्या होत्या. प्रकल्पासाठी झालेल्या भूसंपादनात जमीन गेली तरीही अनेक वर्षे सरकारकडून नुकसानभरपाई न मिळाल्याने ते निराश होते.




























































