
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत ‘ग्रीन’ फटाके वाजवण्याची सक्ती केली आहे. दिल्लीभर फिरूनही अशा प्रकारचे फटाके कुठेही न मिळाल्याने व्यापाऱ्यांनी शेवटी हिरव्यागार भाज्यांमध्ये फटाके बसवून तेच वाजवले! भेंडी, मिरची, कारले, मुळा, गाजर अशा भाज्यांचे ‘ग्रीन’ फटाके फोडण्यात आले!
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘ग्रीन’ फटाके वाजवण्याची सक्ती केली आहे, मात्र हे ‘ग्रीन’ फटाके कुठे मिळतात हे मात्र सांगण्यात आलेले नाही. दिल्लीकरांनी ‘ग्रीन’ फटाके मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले, परंतु अशा प्रकारचे फटाके कुठेही मिळाले नाहीत. सदर बाजारातील व्यापाऱ्यांनी एक नामी शक्कल शोधून काढली. या व्यापाऱ्यांनी भेंडी, मिरची, कारले, मुळा, गाजरात फटाके भरले आणि हेच फटाके वाजवले!
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एच. एस. छाब्रा यांनी ‘ग्रीन’ फटाके कुठे मिळतात हे कुणालाच माहिती नाही असे सांगितले. आम्ही पोलिसांनी ग्रीन फटाके कुठे मिळतात याची यादी द्यावी अशी विनंती केली होती, मात्र पोलिसांनी यादी दिली नाही. बाजारात पर्यावरणपूरक फटाकेच नसतील तर ते आणणार कोठून असा सवालही छाब्रा यांनी केला.
























































