सोशल मीडियावर हिंदू देवतांची विटंबना, हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

62

सामना ऑनलाईन | धुळे

सोशल मीडियावर धुळे शहरातील समाजकंटक वसीम बडा याने हिंदू देवदेवतांची विटंबना होईल अशी वक्तव्ये केली. वसीम बडा आणि चित्रिकरण करणाऱ्यांची शहरातून धिंड काढली जावी अशी मागणी करीत हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला. आग्रारोडवरील राममंदिरापासून हा मोर्चा निघाला. बहुसंख्य हिंदू तरुण राममंदिराजवळ एकत्र आल्याने ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी मंदिराचा परिसर दणाणला. दरम्यान, समाजकंटक वसीम बडा याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे असे निवेदन जमिअत-ए-उलेमा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख राजू भुजबळ यांना दिले.

धुळे शहरात गेल्या काही आठवडय़ांपासून गोरक्षक आणि इतरांमध्ये वादविवाद होत आहेत. काही आठवडय़ांपूर्वी दोन गोरक्षकांना मारहाण झाली. या पार्श्वभूमीवर शहरातील मच्छीबाजार चौक परिसरात राहणाऱ्या वसीम बडा या नावाने परिचित असलेल्या तरुणाने गोरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करतानाच हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह विधाने केली. याशिवाय हिंदू महिलांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने करीत भावना भडकविल्या. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रारी झाल्या. वसीम बडा आणि त्याच्या सहकाऱ्यांची शहरातून धिंड काढली जावी अशी मागणी घेऊन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. शनिवारी सायंकाळी आग्रा रोडवरील राममंदिरावर दिडशे ते दोनशे कार्यकर्ते एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत वसीम बडा या समाजकंटकाचा निषेध नोंदविला. पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह इतरांनी चर्चा करीत मोर्चाकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या भूमिकेवर ठाम राहत मोर्चाकरी पोलीस मुख्यालयाच्या दिशेने निघाले. यावेळी कथित हिंदुत्ववादी राजकारण्यांचा मोर्चातील कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदविला. पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडविण्यात आला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे राजेंद्र पाटील ऊर्फ राज महाराज, साहेबचंद जैन यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हिंदू देवदेवता आणि हिंदू महिलांसंदर्भात जी काही विधाने वसीम बडा याने केली ती घृणास्पद आणि चिड निर्माण करणारी आहेत. या कृत्याबद्दल पोलीस प्रशासनाने त्याची जाहीर धिंड काढली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.

पोलीस मुख्यालयावर मोर्चकऱ्यांना अडविल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले की, सोशल मीडियावर क्लिप व्हायरल होताच आम्ही वसीम बडा आणि त्याच्या आक्षेपार्ह विधानाचे चित्रीकरण करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सामाजिक ऐकोपा भंग करणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईलच. मात्र हिंदू धर्मीयांनी सहिष्णुता पाळत शांतता राखावी, असे आवाहन उपअधीक्षक हिरे यांनी केले.

वसीम बडावर कारवाईची मुस्लिमांची मागणी
दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह क्लिप व्हायरल करणाऱ्या वसीम बडाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे म्हणत जमिअत-ए-उलेमा या संघटनेने कारवाईसाठी निवेदन दिले. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख राजू भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजकंटक वसीम बडा याने १२ जुलैस हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले आहेत याचा आम्ही जमिअत-ए-उलेमाचे सदस्य, मुस्लिम धर्म प्रचारक तीव्र शब्दांत निषेध करतो तसेच दिलगिरीदेखील व्यक्त करतो. वसीम नावाचा हा तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. निरनिराळय़ा पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी सक्त कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना हाफिज रहेमान, मौलाना जियाउर रहेमान, मौलान शकील कासमी यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु पोलीस प्रशासन सतर्क आहे. सोशल मीडियावर सामाजिक शांतता धोक्यात येईल असे प्रयत्न होताच वसीम बडा आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कायदेशीर तरतुदीनुसार त्यांच्यावर कारवाई होईल, पण हिंदू कार्यकर्त्यांनी संयमाने घ्यावे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा होईल असे कृत्य करू नये.

आपली प्रतिक्रिया द्या