
सामना ऑनलाईन । सांगली
सांगली जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी कामेरी आणि कसबे डिग्रज येतील साखर कारखान्याची विभागीय कार्यालये पटवून दिली आहेत. तर, ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली देखील पेटवल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी जाळपोळ आणि टायर फोडण्याच्या घटना घडत आहेत. कामेरी येथील राजारामबापू साखर कारखान्यांचे गट कार्यालय आणि कसबे डिग्रज येथील वसंतदादा साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय अज्ञातांनी पेटवलं आहे. तर वाळवा तालुक्यातील भडकंबे येथे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पेटवल्या आहेत.
ऊसाला एफआरपी अधिक 200 रुपये जो पर्यंत दिले जात नाहीत, तोपर्यंत साखर कारखान्यांना ऊस दिला जाणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. मात्र अनेक साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केले आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत साखर कारखान्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा 10 तारखेला चक्का जाम आणि गाव बंद आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दिला आहे.

























































