
सॅनिटरी पॅड ही महिलांची एक मूलभूत गरज असून राज्य सरकारने रेशन दुकानांवर धान्याप्रमाणे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केली आहे.
‘ती फाउंडेशन’तर्फे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस व ती फाऊंडेशन डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत काम करणाऱया यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना डॉ. लव्हेकर पुढे म्हणाल्या, आपल्या देशात सुमारे 60 कोटी महिला आहेत. त्यातील सुमारे 35.5 कोटी महिलांना मासिक पाळी येते. यातील फक्त 15 टक्के मुली व महिलाच सॅनिटरी पॅड वापरतात. सुमारे 85 टक्के महिला अजूनही सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. ज्यामुळे दरवर्षी कित्येक महिलांना सर्व्हायकल पॅन्सरसारखे आजार होतात. 25 टक्के मुलींची शाळेत गैरहजेरी लागते. मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मासिक पाळीच्या दिवसांतील स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी ‘वॉक फॉर कॉझ’ या रॅम्प वॉकचे आयोजनदेखील करण्यात आले होते. यावेळी आमदार, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, संगीतकार अनू मलिक, गायक उदित नारायण, पोलीस उपायुक्त सुनीता साळुंखे, महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी मेघना तळेकर, अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, अभिनेत्री उपासना सेन आदी उपस्थित होते.

























































