सूफी गायकीतला मराठी ठसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूफी आणि गझल गायनात पूजा गायतोंडे ही आजच्या काळातील होतकरू तरुण मराठी गायिका. आता तिला बॉलीवूडमध्ये जायचंय.

साधारणपणे आजच्या तरुण-तरुणी शास्त्रीय गायनाकडे फार कमी वळतात. त्यात सूफी गायकीकडे त्या आकर्षित होणं हे दूरच राहिलं, पण आजच्याच काळातली पूजा गायतोंडे ही तरुणी मात्र चक्क सूफी गायिका म्हणून प्रसिद्ध आहे. ती प्रसिद्ध तर आहेच, पण आजच्या काळातील बुद्धिमान गायिका अशीच तिची ख्याती आहे.

तिने आपल्या वयाच्या दहाव्या वर्षापासून संगीत शिकायला सुरुवात केली आहे. विकास भाटवडेकर यांनी आपल्याला गझल गायकीची आवड लावल्याचं ती स्पष्ट करते. शास्त्रीय गायकी आणि सूफी गायकी यात फरक विषद करताना पूजा सांगते, सूफी गायकी ही शब्दप्रधान गायकी असते. शास्त्रीय गायकी ही स्वरप्रधान असते. आपल्या गायकीबद्दल बोलताना ती सांगते की, मी गझल गात होते. अनेक कार्यक्रमही केले, पण एका कार्यक्रमात एक मुस्लिम गृहस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, तुझा आवाज खूप छान आहे. तुझा हा आवाज सुफी गायनासाठी उत्कृष्ट ठरेल, पण तू जरा आपल्या उर्दू उच्चारणाकडे लक्ष दे. उर्दू शिकलीस तर तुझे उच्चार, उर्दू शब्द योग्य प्रकारे येऊ शकतील. त्यामुळे मग मी उर्दू शिकायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत सुफी गायिका म्हणून मी प्रसिद्ध झाले.

सूफी गायनाचे वैशिष्टय़ सांगताना पूजा म्हणते, सूफी गायनाचे सूर ऐकताना समोरच्या व्यक्तीला त्या गाण्यातील शब्दांचा अर्थ समजत असेल वा नसेल, पण तरीही तो गुंग होतो. कारण या गाण्यात एक ताल असतो. एक खास ऊर्जा लागते ती या गाण्यात असते, असं ती म्हणते.

पूजा हिने आतापर्यंत बऱ्याच कार्यक्रमांमध्ये गाणं सादर केलंय. ‘जहाँ-ए-खुसरो’मध्येही तिला गायनाची संधी मिळाली आहे. आता तिला बॉलीवूडमध्ये जायचे वेध लागले आहेत. सध्या तरी तिला तशी काही ऑफर आलेली नाही, पण सिनेमांसाठी लागणारी गाणी गाण्याचा सराव ती करायला लागली आहे. अलीकडेच वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये तिच्या गायनाचा ‘सूफी जॅझ’ हा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमात तिला ज्येष्ठ पियानोवादक लुईज बँक्स यांनी साथ केली होती.