जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीनावर कोयत्याने वार, पाच सराईतांना अटक

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलावर तलवारी आणि कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळक्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारस ताडीवाला रस्ता परिसरात घडली.

विनोद उर्फ विन्या सुनिल वाघमारे (वय – 19), साहील उर्फ सोन्या राजु वाघमारे (वय – 20), संघर्ष उर्फ भाव्या नितीन आडसुळ (वय – 19), श्याम काळे (वय – 21), शुभम धिवार (ल – 21, सर्व रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. त्यांचे साथीदार सुलतान उर्फ टिप्या, रामनाथ उर्फ पापा सोनावणे, सोनु परमार, अनिकेत खंदारे, सागर उर्फ सॉगी गायकवाड (सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव पुजारी (वय – 14) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याची आई अर्चना सिध्देश्वर पुजारी (वय – 36, रा. विश्वदीप तरूण मंडळ, ताडीवाला रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

जुन्या भांडणाच्या कारणावरून व पाठीमागे चिडवत असल्याच्या राग मनामध्ये धरून टोळक्याने गौरवला शिवीगाळ केली. तू आम्हाला आमच्या पाठीमागे चिडवतोस काय? आज तुझी गेमच करून टाकतो म्हणत आरोपींनी कोयता, रॉड, बांबू, तलवारीने गौरवला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याच्या खुनाचा प्रयत्न करीत परिसरात दहशत माजविली.

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून चतःशृंगी पुढील पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या