वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईताकडून दोन रिक्षा, एक दुचाकी जप्त

पुणे शहर परिसरात वाहनचोर्‍या करणार्‍या सराईताला बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 2 रिक्षा, 1 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

रफिक छोटू शेख (21, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहर परिसरात वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हद्दीत गस्त वाढविण्यात आली असून वाहनचोरांचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान संशयित वाहनचोर शेख याला बंडगार्डन परिसरातून रिक्षासह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने रिक्षा आणि दुचाकीची चोरी केल्याचे उघड झाले.

त्यामुळे पोलिसांच्या पथकाने शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने बंडगार्डनसह कोंढवा, निगडी आदी भागांत वाहनचोर्‍या केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी 2 रिक्षा, 1दुचाकी जप्त केली असून 3 गुन्ह्याचा छडा लावला आहे. परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, अंमलदार सुधीर घोटकुले, अमोल सरडे, शंकर संपते, ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.