नवले पुलाजवळ पिकअप उलटून चारजण जखमी

नवले ब्रीज परिसरात अपघातांची मालिका कायम असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पिकअप चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांसह वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास पिकअप चालक निघाला होता. त्यावेळी त्याचे नर्‍हे परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटून पीकअपर महामार्गावर पलटी झाला. त्यामुळे वाहनामध्ये बसलेले चार प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याशिवाय अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले.

पिकअप वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे आमचे वाहन पलटी झाल्याचा दावा केला. दरम्यान, मागील आठवड्यात परिसरात अपघात सातत्याने घडत असून आतापर्यंत आठ अपघात परिसरात घडले आहेत. वारंवार घडणार्‍या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.