
दरोडा आणि अपहरणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेने वारजे ब्रीज परिसरातून अटक केले. जनार्धन गणपत गायकवाड (वय -23, रा. खेचरे, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मार्च महिन्यात जर्नादन याने साथीदारांच्या मदतीने खेचरे गावात बापू दहीभाते यांना अडवून त्यांच्यावर हत्याराने वार करून 52 हजार रुपये लुटले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी त्याने पुन्हा एका दुचाकी चालकाला अडवून झाडाला बांधून पैशांची मागणी केली होती. या गुन्ह्यात जनार्धन पसार झाला होता.
दरम्यान, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे कर्मचारी निलेश शिवतारे, अतुल मेंगे आणि सुमित ताकपेरे यांना फरारी आरोपी जनार्धान वारजे ब्रिजजवळ आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण आणि कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी सापळा रचून जनार्धनला ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी पौड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.






























































