हडपसरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या कोयते गँगला अटक, चार कोयत्यांसह दोन मोबाईल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हडपसरमध्ये कोयत्याच्या धाकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला युनीट सहाने अटक केली. त्यांच्याकडून चार कोयते, दोन मोबाइल, इतर शस्त्रास्त्रे असा 1 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी मोबाइल शॉपीची तोडफोड करून कोयत्याच्या धाकाने धुडगूस घालणार्‍या टोळीविरूद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकतीच मोक्का कारवाई केली आहे.

आकाश मोहन कांबळे उर्फ राणा( वय 22 रा. गंगानगर, हडपसर), साहिल मुक्तार शेख (वय 20 रा. हरपळे वस्ती ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अमलदार कानिफनाथ कारखेले यांनी फिर्याद दिली आहे.

युनीट सहाचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना हडपसरमधील गंगानगर परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी आकाश अणि साहिलला ताब्यात घेत अटक केली. त्यांच्या इतर दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार कोयते, दोन मोबाइल असा 1 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. कोयत्याच्या धाकाने परिससरात दरोडा टाकून लुटमार करण्याची कबुली टोळीने दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली.

हडपसरमध्ये कोयत्याच्या धाकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार कोयते, इतर शस्त्र, दोन मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत आहे.
रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट सहा