
कसबा पेठेत दहशत माजविणार्या सराईताविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुंडाला वर्षभरासाठी कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
संकेत उर्फ भूषण आनंद तारु (22, रा. कसबा पेठ) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. तारु याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, पिस्तुल बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मागील पाच वर्षांत त्याच्यावर विविध प्रकारचे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आतापर्यंत शहरातील 89 गुंडांच्या विरोधात एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.


























































