पुणे – महिलांचे मोबाईल फोन हिसकाविणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

शहरातील विविध भागातील महिलांना लक्ष्य करून मोबाईल हिसकाविणाऱ्या आंतरराज्य टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि 14 मोबाईल असा पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मनोज काशिनाथ कासले (वय 20), शिलारसाहेब मोहम्मद ईस्माईल सौदागर (वय 20), बालाजी धनराज कासले (वय 22) आणि शेरली चांदसाहेब शेख (वय 22 सर्व रा. मूळ- भालकी कर्नाटक सध्या रा कस्तुरबा वसाहत औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोबाईल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी महिलांचे मोबाईल हिसकाविणारे चारजण दोन दुचाकीवरून विमानगरमध्ये येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांनी चोरलेल्या दोन दुचाकीपैकी एक दुचाकी कर्नाटकमधून चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, अविनाश शेवाळे, गणेश साळुखे, उमेश धेंडे, अशोक आटोळे, रमेश लोहकरे, सचिन जाधव, विनोद महाजन, हरुण पठाण, विनोद भोसले, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, रुपेश पिसाळ, गिरीष नाणेकर शिवराज चव्हाण यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या