पुणे विभागातील 39 ‘क्लास वन’ लाचखोर जाळ्यात, साडेतीन वर्षातील कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश राख

सरकारी काम अन् महिनाभर थांब, अशी म्हण प्रचलित असतानाच आता ‘मोठा अधिकारी, मोठी लाच’ अशी नवी म्हण आकार घेऊ लागली आहे. कोट्यावधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी पालिकेतील ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांयासह त्याच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. एवढेच नाही तर मागील केवळ आठवडाभरातच पुणे एसीबीने पाच ‘क्लास वन’ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर, गेल्या साडेतीन वर्षात 39 जणांवर कारवाई केली. त्यामुळे लाचखोरांमध्ये आता ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांचा टक्का वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

सरकारी विभागांमध्ये विविध कामांसाठी नागरिकांची अडवणूक करीत लाच घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत लाच घेतली जाते. एकीकडे सरकार पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न करत असले तरी सरकारी विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिपत्याखाली पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे एलसीबीच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जातात. यामध्ये सर्वाधिक कारवाईचे प्रमाण पुणे जिल्ह्यातील आहे. नूकतेच पुणे महापालिकेतील उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर एसीबीने कारवाई केली. तब्बल एक कोटीहून अधिक अपसंपदा जमविल्याप्रकरणी ही कारवाई झाली. पुणे पालिकेत मागील वर्षभरात झालेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. याबरोबरच मागील आठ दिवसात पुणे परिसरात जल जीवन प्राधिकरण, जिल्हा रुग्णालय येथे केलेल्या कारवाईत ‘क्लास वन’ असलेल्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जानेवारी 2019 ते जुलै 2022 या साडेतीन वर्षाच्या कालावधीत पुणे विभागात एसीबीने 39 ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये आरोग्य विभागा, एमएसईबी, जिल्हा परिषद, महसूल, पोलीस आदी विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामूळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

वर्ष लाच घेताना   पकडलेले क्लास वन
2019                   11
2020                    8
2021                   10
2022 (आजपर्यंत)     10

…पोलीस विभाग आघाडीवर
लाचखोरी प्रकरणात पुणे विभागात पोलीस दल आघाडीवर आहेत. 2019 ते 2022 (जुलै) या साडेतीन वर्षात 165 पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यामध्ये वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पोलिसांनंतर महसूल विभागाचा क्रमांक लागतो. मागील साडेतीन वर्षात महसूल विभागातील 120 जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. सर्वच विभागात लाच घेणाऱ्यांमध्ये वर्ग तीनचे अधिकारी सर्वात पुढे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.