पैशांच्या वादातून पुण्यात तरुणावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू

पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे तरूणाने एकावर कोयत्याने वार केला. यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना 23 मार्चला एरंडवण्यातील साठे चौकात घडली होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

इंद्रनील चंद्रभूषण मिश्रा (वय – 40, रा. खिलारवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रवीण शंकर कडू (वय – 37, रा. सिंहगडरोड) याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. मंगला मिश्रा (वय – 67) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगला यांचा मुलगा इंद्रनीलने आरोपी प्रवीणकडून पैसे घेतले होते. मात्र, घेतलेले पैसे परत देण्यास उशीर झाल्यामुळे प्रवीणने 23 मार्चला इंद्रनीलला शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले होते. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या इंद्रनीलला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान 14 एप्रिलला त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी संबंधिताविरूद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. इंद्रनीलचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या