
महाशिवरात्री आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून बुधवारी रात्री कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत संयुक्त कारवाईत तब्बल 3 हजार 707 गुन्हेगारांची झाडाझडती घेउन 521 जणांना अटक करण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचसह सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील विविध पथकांनी बुधवारी रात्री नउ ते पहाटे दोन वाजेपर्यंत सर्च मोहिम राबवून 521 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्याशिवाय आर्म अॅक्टप्रमाणे 5 जणांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तर अमली विरोधी पथक एकने टाझानियाच्या तस्कराकडून तब्बल 23 लाख 26 हजारांचे कोकेन जप्त केले. तर अमली विरोधी पथक दोनने मुंढव्यात हुक्का पार्लरवर कारवाई केली. सीआरपीसी कायद्यानुसार 538 आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जामिनावर कारागृहातून सुटून आलेल्या आरोपींनाही नोटीस देण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनवेळी 544 हॉटेल आणि ढाबे लॉजेस तपासण्यात आले. त्याशिवाय 134 बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानकावर गस्त घालण्यात आली. नाकाबंदीदरम्यान 1 हजार 485 संशयितांना अडविण्यात आले होते. त्यापैकी नियमभंग करणार्या 32 जणांविरूद्ध कारवाई करीत 15 हजारांचा दंड वसूल केला.
शिवजयंती आणि महाशिवरात्रीनिमित्त ऑपरेशन ऑल आउटद्वारे पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंंद्र डहाळे, अपर आयुक्त रंजन शर्मा, अपर आयुुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त सुहैल शर्मा, उपायुक्त, शशिकांत बोराटे, उपायुक्त विक्रांत देशमुख, वाहतूक उपायुक्त विजय मगर , एसीपी सुनील पवार, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने केली. कोम्बिंग ऑपरेशनवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल आस्थापना, धाबे, लॉजेसची पोलिसांकडून कारवाई करण्यात आली .

























































