
वारजेतील नामांकित हॉटेल व्यावसायिकाकडे दोन लाखाची खंडणी मागून तडजोडीअंती एक लाख रुपये स्विकारताना दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. यातील एकाकडे रिपब्लिकन पार्टीच्या श्रमीक ब्रिगेडचा सचिव असल्याचे कार्ड मिळाले असून तीच ओळख सांगून तो खंडणी उकळण्याचे प्रकार करत होता.
सुभाष अशोक सहजराव (रा. वारजे माळवाडी), बाळासाहेब हरीभाऊ लोणारे (रा. कुडजे ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील सहजराव याच्याकडे रिपब्लिकन पार्टीचे कार्ड मिळाले आहेत.
पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी शहरातील उद्योजक आणि व्यावसायिकांची बैठक घेऊन अनधिकृत माथाडी व खंडणी संदर्भात बेकायदेशीर पैशाची मागणी, अडवणूक कोणी करीत असेल तर त्या संदर्भात संपर्क करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानास प्रतिसाद देत वारजे माळवाडी येथील हॉटेल व्यावसायिकाला पुणे महानगरपालिका येथे खोटे तक्रारी अर्ज दाखल करण्याची आणि जिवे ठार मारण्याची धमकी देवून दोन लाख रुपयांची खंडणीची मागितली असल्याची तक्रार प्राप्त झाली. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी संबंधीत तक्रारीची तात्काळ दखल घेवून वेगवेगळी दोन पथक तयार केली. सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे आणि पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी सापळा रचून दोघ आरोपींना एक लाख रुपयांची खंडणीची रक्कम घेताना शिवणे भागातून रंगेहात ताब्यात घेतले. दोघांविरुध्द उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, सैदोबा भोजराव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
अर्ज करून खंडणी उकळणारी टोळी सक्रीय?
कोथरूडमधील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या पत्र्याच्या शेडविरोधात महापालिकेत अर्ज करून नंतर कारवाई टाळण्यासाठी खंडणीची मागणी करणार्या महिलेसह दोघांना नूकतीच अटक करण्यात आली. त्यानंतर आता हॉटेल व्यावसायिकाच्याबाबत देखील असाच प्रकार समोर आल्याने महापालिकेत तक्रार अर्ज करून त्यानंतर खंडणीच्या माध्यमातून तडजोड करणारी टोळी सक्रीय असल्याचे दिसून येत आहे.



























































