जनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा नाकारू शकतो? मुख्यमंत्र्यांचा सिद्धूला टोला

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूला टोला लगावला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांना दिलेले काम करायचे नसेल, तर मी काहीच करू शकत नाही, असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, ‘जर सिद्धू यांना दिलेले काम करायचे नसेल, तर मी काहीही करू शकत नाही. जनरलने दिलेली जबाबदारी एक सैनिक कशी काय नाकारू शकतो. जर कोणतेही सरकार कार्यक्षमपणे चालवायचे असेल, तर त्यामध्ये शिस्त असली पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच सिद्धू यांना दिलेली नवी जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी होती. तसे न करता त्यांनी ऐन मोसमात काम करणेच बंद केले, याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला.

याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांनी रविवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. सिद्धूने सोमवारी आपला राजीनामा अमरिंदर सिंग यांच्याकडेही पाठवला. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडे आपला राजीनामा पोहोचला असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीनंतर वादाला सुरुवात
नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून वाद सुरू आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याचे खापर सिद्धूवर फोडण्यात आले. त्यानंतर झालेल्या अनेक बैठकींना सिद्धू अनुपस्थित राहिला. यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचा अखेर सिद्धू यांच्या राजीनाम्याने झाली.

आपली प्रतिक्रिया द्या