चरणजीत चन्नी असतील पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; राहुल गांधी यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, यावर चर्चा सुरू होती. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पंजाबमध्ये चरणजीत चन्नी काँग्रसकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले नवज्योतसिंह सिद्धू यांनी नरमाईची भूमिका घेत मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी घेतील, तो निर्णय मान्य असेल, असे जाहीर केले होते. तसेच कोणीही मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्यासोबत काम करण्यास संमती दर्शवली होती.

पंजाबच्या विधानसभा निवडणूकीत बाजी मारण्यासाठी विविध पक्षांकडून आकर्षक घोषणा करण्यात येत आहेत. त्यात पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा मुद्दाही महत्त्वाचा ठरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका रॅलीत पंजाबमध्ये चरणजीत चन्नी हे पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच सिद्धू यांनीही पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केल्याने अंतर्गत नाराजीही मिटल्याचे दिसत आहे.

काँग्रेसपक्षाकडे अनेक हिरे आहेत. आपण 2004 पासून राजकारणात आहोत. आपल्याकडे असलेला अनुभव आणि दूरदृष्टीने विचार करता एका हिऱ्याची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून निवड करणे कठीण असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसकडून चन्नी हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी जाहीर केले. काही व्यक्ती आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणताही राजकीय नेता 15 दिवसात तयार होत नाही. जनतेसाठी संघर्ष करणाराच राजकीय नेता बनतो, असे ते म्हणाले.

राहुल गांधी हेच खरे सिंह आहेत. त्यांनी चार वर्षातच आपल्याला प्रदेशाध्यक्ष बनवले. त्यासाठी त्यांचा आयुष्यभर आभारी राहीन, असे नवज्योतसिंह सिद्धू यांनी सांगितले. आपण 13 भाजपात होते. त्यांनी आपल्याला फक्त प्रचारासाठी सर्वत्र फिरवले. मात्र, काँग्रेसने आपल्याकडे मोठी जबाबदारी दिली. मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल, जो कोणी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल, त्याच्यासोबत काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. त्यानंतर रविवारी राहुल गांधी यांनी पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.