आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा!! राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी आदिवासी वसतिगृहातील विविध प्रश्नांवर गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करणाऱया विद्यार्थ्यांसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. राहुल गांधी यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. न्याय्यहक्कांसाठी लढणाऱया आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे.

राहुल यांनी ‘एक्स’वर हे पत्र शेअर केले आहे. त्यातून राहुल यांनी वसतिगृहात राहणाऱया आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. ’आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठी 30 वर्षांची जाचक अट आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. अनेक वसतिगृहे असुरक्षित आहेत. तिथे पुरेसे जेवण, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. सर्पदंशांसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे. महिलांच्या बाबतीत परिस्थिती जास्त भयानक आहे. दीर्घ कालावधीनंतर वसतिगृहात परतणाऱया विद्यार्थिनींना आपली ‘पात्रता’ सिद्ध करण्यासाठी गर्भधारणा चाचणी आणि इतर अनेक वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागते. ही एक प्रकारची मानहानी आहे. हा नियम त्यांच्या सन्मानावर केलेला आघात आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.